ACHARYA ABHISHEK

‘सिटीलाइट्स’

"एखादी सौंदर्यकृती समजण्यासाठी जर तिचे विश्लेषण करावे लागत असेल, इतर कुणी त्यावर भाष्य करण्याची गरज असेल तर तिचा उद्देश सफल झाला का, असा मला प्रश्न पडतो." चार्ली चॅप्लिन.

एखादी सौंदर्यकृती समजण्यासाठी जर तिचे विश्लेषण करावे लागत असेल, इतर कुणी त्यावर भाष्य करण्याची गरज असेल तर तिचा उद्देश सफल झाला का, असा मला प्रश्न पडतो.” चार्ली चॅप्लिन.

Charlie Chaplin
Charlie Chaplin

“एखादी सौंदर्यकृती समजण्यासाठी जर तिचे विश्लेषण करावे लागत असेल, इतर कुणी त्यावर भाष्य करण्याची गरज असेल तर तिचा उद्देश सफल झाला का, असा मला प्रश्न पडतो.” चार्ली चॅप्लिन.

‘सिटीलाइट्स’ या चार्ली चॅप्लिनच्या असामान्य चित्रपटावर काही लिहिण्यापूर्वी मला त्यानेच काढलेले वरील उदगार आठवले आणि मी थबकलो. श्रेष्ठ कलाकृतीला भाष्याची गरज असते हे तर खरेच. पण शेवटी त्यांच्यासंबंधी लिहिणेही आवश्यक असते. या लिखाणाचा एक उद्देश त्या कलाकृतीने आपल्याला दिलेल्या आनंदाचे ऋण फेडणे हा असतो. तो आनंद इतरांपर्यंत पोचवायला हवा ही ओढ यामागे असते. दुसरे म्हणजे कलाकृतीवरचा लेख म्हणजे नेहमी तिच्यावरील भाष्यच असेल असे नव्हे. स्वतःलाच अधिक समजून घेण्याचाही तो प्रयत्न असतो. सिटीलाइट्स’ हा चित्रपट १९३१ या वर्षी प्रकाशित झाला. मात्र त्यापूर्वी जवळजवळ तीन वर्षे त्याची निर्मिती चालू होती.

या काळात चित्रपटसृष्टीत एक मोठी क्रांती येऊ घातली होती, ती होती आवाजाची क्रांती. सिनेमाला ‘आवाज’ मिळाला होता. या घटनेचे फार दुरगामी परिणाम चित्रपट व्यवसायावर झाले. प्रेक्षकांना या तंत्राचे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे यानतर लोक मूकपट पाहतील की नाही या भीतीने निर्मात्यांनी मूकपट काढणे बंद केले. याचा फटका लिहिता वाचता न येणाऱ्या अनेक कलाकारांना जास्त बसला. कारण बोलपटासाठी शुद्ध, स्वच्छ उच्चार हा एक आवश्यक गुण बनला. त्यामुळे दुसरी एक गोष्ट अशी झाली की नाटकातली नटमंडळी मोठ्या संख्येने चित्रपटात शिरली. चित्रपट शब्दबंबाळ बनण्याची सुरुवात लगेच झाली. बोलता येऊ लागले की पात्रे बोलतच सुटली. आपल्याकडेही याच पद्धतीने चित्रपटाचा विकास झाला. आजही बहुसंख्य चित्रपट हे बोल’पटच असतात. मौनाची भाषा लोक विसरूनच गेले आहेत.

मात्र चार्ली चॅप्लिनने या बदलाचा इतक्या तडकाफडकी स्वीकार करण्याचे नाकारले. त्याने हट्टाने ‘सिटीलाइट्स मूकच ठेवला. फक्त काही ठिकाणी त्याने ध्वनीचा उपयोग केला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी प्रथमच त्याने पार्श्वसंगीतही तयार केले. चॅप्लिनची भूमिका अशी होती की, जर त्याचा ट्रॅम्प इंग्रजी बोलू लागला तर तो एका भाषेच्या बंधनात अडकेल. इंग्रजी न जाणणाऱ्या माणसाला तो परका वाट लागेल. चेहऱ्याची भाषा ही वैश्विक भाषा आहे, हे जाणून चॅप्लिनने हा निर्णय घेतला होता, व तो किती योग्य होता हे चित्रपट प्रकाशित झाल्यावर सिद्ध झाले.

लोक बोलपटाकडे वळले म्हणून आपणही वळावे हे चॅप्लिनला मान्य नव्हते. लोकाना हसविणे हे त्याचे ध्येय्य होते हे खरे, पण तो लोकांचा खुशमस्कऱ्या नव्हता. पब्लिकला जे हवे ते आम्ही देतो असे काही निर्माते-दिग्दर्शक सतत म्हणत आले आहेत. (आपल्याकडेही ही भूमिका घेणारे, दिग्दर्शक होते व अजुन आहेत) या बाबतीत चॅप्लिनचे मत वेगळे होते. त्याने म्हटले आहे-‘आपल्याला काय हवे हे पब्लिकला माहीत असते यावर माझा विश्वास नाही.’ ही भूमिका एकदा घेतली की, लोकांना दिशा दाखविण्याची कलावंतावरची जबाबदारी वाढते. ही जबाबदारी घेण्यास चॅप्लिन नेहमीच तयार होता. यासाठी तो प्रचंड कष्ट घेई. अनेकदा एकेका दृश्याचे पन्नास पन्नास टेक घेतानाही तो थकत नसे. त्याने या सिनेमासाठी तीन लाख चौदा हजार फूट लांबीची फिल्म शूट केली होती. त्यातून कोरून काढून त्याने केवळ आठ हजार फुटांचे असामान्य चित्रशिल्प तयार केले.

एक भटक्या आणि एक फुले विकणारी अध तरुणी यांची या चित्रपटात चॅप्लिनने सांगितलेली कथा मात्र सुरुवातीला काही वेगळीच होती. प्रथम चप्लिनच्या मनात स्वतः अंध विदषकाची भूमिका करावी असे होते. मात्र नंतर त्याने हा विचार बदलला. या चित्रपटासाठी त्याने व्हर्जिनिया चोरिल या नावाची एक वीस वर्षांची तरुणी नायिका म्हणून घेतली. तिला अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता, पण चॉप्लिनला त्याची आवश्यकता भासत नव्हती. तिने फक्त आपल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात, अशी त्याची अपेक्षा होती. आंधळी नायिका साकार करण्यासाठी त्याने तिला एक बहुमोल सल्ला दिला होता- ‘स्वतःच्या आत डोकावून पाहा. माझ्याकडे पाहू नकोस!’ त्याचे शिकविणे हे फार आग्रही व प्रतिसाद मागणारे असे.

मनासारखा शॉट उतरेपर्यंत तो स्वतःही काम करावयाचा आणि तिच्याकडनही करून घ्यायचा. त्यामुळे त्यांचे संबंध फारसे सलोख्याचे कधीच नव्हते. वास्तविक चॅप्लिनबरोबरच्या इतर नायिकांचे व त्याचे संबंध नेहमी जरा जास्तच ‘खेळीमेळी’चे असत. ही एकमेव नायिका, जिच्याशी त्याचे पटले नाही. एकदा वैतागून त्याने नायिकादेखील बदलली.

Charlie Chaplin

दुसऱ्या एका नटीला ही भूमिका देऊन त्याने काही भाग चित्रीतही केला. पण नंतर त्याच्या ध्यानात आले की, व्हर्जिनिया हीच या भूमिकेसाठी योग्य आहे. त्याने पुन्हा तिला बोलावन हा सिनेमा पूर्ण केला. या चित्रपटाच्या प्रकाशनानंतर सुमारे ५० वर्षांनी चेरिलने आपल्या आठवणीत लिहिले- ‘Charlie never liked me and I never liked him.

सिटीलाइट्स चा प्रीमियर चॅप्लिनने धमधडाक्यात केले. लॉस एंजल्समधील प्रीमिअरला प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन हजर होते तर लंडनच्या प्रीमिअरला जॉर्ज बर्नार्ड शॉ हे प्रमुख पाहुणे होते.

सिटीलाइट्स ची कथा तशी फार साधी होती. एक गरीब भटक्या निरुद्देश भटकत असताना त्याची गाठ एका अंध फुलवालीशी पडते. ती चुकून त्याला श्रीमंत समजते. तो हळहळ तिच्यात गुंततो. तिच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी खप प्रयत्नाने आवश्यक ती रक्कम उभी करतो. ऑपरेशन होते. तिला दिस् लागते. मात्र आता या दरिद्री भटक्याला तिला भेटण्याचा संकोच वाट लागलेला असतो. एके दिवशी अकस्मात त्यांची पुन्हा गाठ पडते आणि…

अंध तरुणीला मदत करण्याची भटक्याला खुप इच्छा असते पण रक्कम कोठन आणणार? अशा वेळी योगायोगाने एके रात्री, त्याला जीवनाला कंटाळलेला, आत्महत्या करू पाहणारा एक लक्षाधीश भेटतो. गळ्यात दगड बांधुन पाण्यात उडी मारण्याचा त्याचा विचार असतो. भटक्या त्याला म्हणतो.

“अहो, हे काय चालविले आहे?”

“मी जीवनाला कंटाळलो आहे. मला मरू द्या.”

“जीवनाला कंटाळून कसे चालेल? उद्या पाखरे पुन्हा गाऊ लागतील”

‘उद्या पाखरे पुन्हा गाऊ लागतील!’ हा चॅप्लिनने साऱ्याच चित्रपटांतून सांगितलेला जादूचा मंत्र आहे!

हा लखपती भटक्याला आपला मित्र मानतो. पण त्याची एक गंमत असते. रात्री दारूच्या नशेत तो एक भावनाप्रधान माणूस बनतो पण दिवसा, नशा उतरल्यावर तो अत्यंत कठोर, पाषाणहृदयी धनवान असतो. दुसऱ्या दिवशी तो भटक्याला ओळखीतही नाही. हळुहळु  अंध तरुणीची व भटक्याची मैत्री वाढते पण आपल्या मनातील भावना त्यांनाच स्पष्ट झालेल्या नसतात. तरुणीची दृष्टी यावी यासाठीच्या ऑपरेशनसाठी लागणारा पैसा कोठून उभा करणार, असा प्रश्न भटक्याला पडतो. यासाठी तो एक बॉक्सिंगचा सामना जिवावर उदार होऊन खेळतो. बॉक्सिंगचा हा प्रसंग चित्रपटातील अत्यंत अफलातून असा प्रसंग आहे. रॉजर इबर्ट या समीक्षकाच्या मते ‘It is funniest sporting event ever filmed.’ एखाद्या उत्तम कसरतपटच्या कौशल्याने चॅप्लिन बॉक्सिंग रिंगमध्ये धमाल करतो. तो नाचतो काय, उड्या मारतो काय, भेदरल्याचा आव आणतो काय, सारेच विलक्षण! समोर बॉक्सर प्रहार करायला आला की हा रेफीमागे लपतो.

पार्श्वसंगीताने आता जलद लय पकडलेली असते. त्या लयीवर बॉक्सर, भटक्या, रेफी सारेच झुलू लागतात. ठोसा मारण्यासाठी बॉक्सरला प्रतिस्पर्धीच सापडत नाही. हसुन हसून आपली पुरेवाट होते. मध्येच भटक्याच्या गळ्यात घटेची दोरी अडकते. तिचा आवाज आणखी धमाल आणतो. रेफीलाही काय चालले आहे. समजत नाही. हे सारे इतके हास्योस्पादक आहे की शब्दांतून मांडताना मूळच्या शतांशही परिणाम साधत नाही. चित्रपटकलेचे अफाट सामर्थ्य ध्यानात येते.

योगायोगाने भटक्या लक्षाधीशापासून काही रक्कम मिळविण्यात यशस्वी होतो. मात्र पोलीस त्याचा चोर म्हणून संशय घेतात. त्यांना चुकवन तो कसाबसा अंध तरुणीला पैसे आणून देतो. गावाला जायचे आहे, असे खोटेच सांगून तिचा निरोप घेतो. आपल्याला तुरुंगात जावे लागणार हे त्याला ठाऊक असते. पुन्हा केव्हा येणार? या तिच्या निरागस प्रश्नाला त्याच्याजवळ उत्तर नसते. तो नुसताच व्याकळपणे तिच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना तिला वाचता येत नाहीत ही किती चांगली गोष्ट असते! (मात्र आपल्याला त्याचा तो मुद्राभिनय पाहता येतो ही किती आनंदाची गोष्ट असते!) ऑपरेशन यशस्वी होऊन फुलवालीची दृष्टी परत येते. ती आता एक फुलांचे दुकान थाटते. मनात तीही आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहत असते. अचानक दोघांची पुन्हा भेट होते. भटक्या तिला ओळखतो, पण तिने त्याला पाहिले नसल्यामुळे ती ओळखत नाही. तिला समोर दिसतो एक गरीब भटक्या. ती फुलांच्या गुच्छातील एक फूल त्याला देऊ पाहते. आपल्या परिस्थितीची जाणीव होऊन तो मागे सरकतो, पण चार पावले पुढे येऊन ती त्याचा हात हातात घेते. त्यात फुल ठेवते.

…आणि त्या क्षणी तिला त्याची ओळख पटते. डोळ्यांना जे समजले नाही ते स्पशनि किती स्वच्छपणे समजावून दिले होते।

भटक्या विचारतो, “तुला आता दिस लागले आहे?”

ती उत्तरते : “होय मला आता दिस लागले आहे.”

त्या एका क्षणात तिला बरेच काही दिसले आहे. त्याची गरिबी, त्याचा भाबडेपणा, तिला सुखी करण्याची त्याची धडपड, त्याच्या मनाचा उमदेपणा, त्याचे प्रेम. हे सारे क्षणात तिला लख्ख दिसते. समोर येऊनही तो आपल्याशी का बोलला नाही हेही तिला कळते. प्रेमाच्या साक्षात्काराचा तो दिव्य क्षण होता. भटक्या हातात फुल घेऊन विद्ध नजरेने तिच्याकडे पाहत असतो. तिला सारे समजले आहे, हेदेखील त्याला तिच्या नजरेवरून समजले आहे. आनंदवर्षावात चिंब झालेला त्याचा चेहरा आता सारा पडदा व्यापून टाकतो. या दोन निरागस जिवांच्या मीलनाचा आनंद आपले मनही व्यापून टाकताना आपल्या डोळ्यात आनंदजल पसरते आणि मग समोरचे काहीच दिसत नाही. चित्रपट संपलेला असतो!

हा शेवटचा प्रसंग जागतिक चित्रपट इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणून अनेक समीक्षकांनी गौरविला आहे. या प्रसंगाबद्दल खुद्द चॅप्लिनने लिहिले आहे. ‘सिटीलाइट’मधील त्या शेवटच्या प्रसंगात मी अभिनय करीत नव्हतोच मी फक्त माझ्यातून बाजूला होऊन पाहत होतो.’

‘हा चित्रपट पाहताना आपण मनसोक्त हसलेलो असतो, आतुन हललेलोही असतो व पाहिल्यानंतर काहीसे अधिक शहाणेही झालेलो असतो’, असे एका टीकाकाराने म्हटले आहे. या सिनेमाचा अनेक लेखकावरही मोठा प्रभाव पडला. वि. वा. शिरवाडकरांनी आपले विदूषक हे नाटक याच चित्रपटाचा आधार घेऊन लिहिले. ‘मी पाहिलेला सर्वश्रेष्ठ विदुषक: चार्ली चॅप्लिन’ अशी या नाटकाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे.

मार्क बोनें या समीक्षकाने लिहिले आहे. ‘जर आपल्याला अंतराळात एखादी कालकुपी पाठवायची असेल तर मानवी संस्कृतीची उज्ज्वल बाजू दाखविणारी ‘सिटीलाइट्स’ सारखी कलाकृती तिचे योग्य प्रतिनिधित्व करू शकेल, असे मला वाटते… शेवटचा प्रसंग जर एखाद्याच्या मनाला खोल स्पर्श करू शकला नाही तर तो सुसंस्कृत जगात वावरण्यास लायक नाही!

विजय पाडळकर