ACHARYA ABHISHEK

एरिक व्हॉन स्ट्रॉहेम

मूकपटांचे युग संपून बोलपटांचे युग निर्माण झाले त्याला आता ८० वर्षे लोटली. मात्र अजूनही मुकपटाची जमान्यातील जे चित्रपट शिळे झालेले नाहीत, ज्यांचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतर पाहतानाही जाणवतो व जे आजही अभ्यासले जातात, अशा मूकपटांत 'ग्रीड' या असामान्य चित्रपटाचा अंतर्भाव केला जातो.

‘मॅक्टिग’ ही एक विलक्षण झपाटन टाकणारी कादंबरी आहे. (या कादंबरीविषयी मी ‘एक पिंजारकेस पुस्तक’ या नावाने एक दीर्घ लेख लिहिला असुन, तो माझ्या ‘रानातील प्रकाश’ या पुस्तकात समाविष्ट आहे.) या कादंबरीमुळे एरिक व्हॉन स्ट्रॉहेमही झपाटला गेला होता. ही कादंबरी तेवढ्याच प्रभावीपणे सिनेमाच्या माध्यमातून जिवंत करायचीच, असा ध्यास त्याने घेतला. ही दीर्घ कादंबरी चित्रपटातून मांडणे हे फार अवघड काम होते. त्यातून मूकपटाच्या काळात तर हे अशक्यप्रायच भासणारे आव्हान होते. ते पेलण्याचा संकल्प एरिकने केला आणि ‘ग्रीड’ या असामान्य चित्रपटाची निर्मिती केली.

‘ग्रीड’ या चित्रपटाच्या निर्मितीची कथा त्या चित्रपटात एवढीच चित्तथरारक आहे. कादंबरीतील तपशीलवार चित्रणाचा दिग्दर्शकावर एवढा परिणाम झाला होता की, संपर्ण वास्तववादी शैलीत त्याने तो सारा तपशील चित्रपटात आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी त्याने चित्रपट पूर्ण केला त्यावेळी त्याची लांबी सुमारे ४८ रिळं भरली. त्याचा कालावधी साडेनऊ तासांचा झाला. चित्रपटात वास्तवता येण्यासाठी त्याने बहुतेक चित्रपट स्टुडिओबाहेर चित्रित केला होता. कथानकाचा क्लायमॅक्स ‘डेथ व्हॅली’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील विस्तीर्ण अल्कलीयुक्त वाळवंटात घडतो. एरिकने हा क्लायमॅक्स डेथ व्हॅलीतच चित्रित करायचे ठरविले. प्रचंड उन्हामुळे व उष्णतेमुळे कलाकारांचे फार हाल झाले. चित्रपटाचा नायक गिब्सन होलॅड हा तर आजारीच पडला. क्लायमॅक्सला दोघे मित्र एकमेकांचे शत्रु बनून समोरासमोर येतात, या प्रसंगाचे चित्रण करताना एरिकने त्या नटांना सांगितले, ‘Fight, fight! Try to hate each other as you hate me.’ अक्षरशः झपाटल्यासारखा एरिक काम करायचा व त्याच्या कामाचा साऱ्यांनाच ताप होई. निर्मात्यांशीही त्याचे कधीच पटले नाही. ‘ग्रीड’ची साडेनऊ तासांची मुळ आवृत्ती आज कुठेच उपलब्ध नाही. तिला Holi Grail of cinema असे म्हटले जाते. पहिल्या आवृत्तीचा काही निवडक लोकांसाठी एक खेळ आयोजित केला गेला होता. तो पाहिलेल्या एका व्यक्तीच्या आठवणीनुसार चित्रपट संपूर्ण होईपर्यंत एरिक व्हॉन स्ट्रॉहेम हा त्याच्या जागेवरून हललादेखील नाही. मात्र, निर्मात्यांना हा प्रयत्न मुळीच पटला नाही. व्यवसायाच्या दृष्टीने साडेनऊ तासांच्या सिनेमाला प्रेक्षक मिळणे शक्य नव्हते. त्यांच्या इच्छेनुसार एरिकने या चित्रपटाची लांबी अध्याने कमी केली. तरीही निर्मात्यांचे समाधान झाले नाही.

यानंतर काटछाट करणे एरिकला मान्य नव्हते. पण निर्मातेही तेवढेच हट्टी होते. त्यानी दुसऱ्या एका संकलकाला बोलावून चित्रपटाची आणखी काटछाट करून फक्त अडीच तासांची एक प्रदर्शनयोग्य आवृत्ती तयार करून घेतली. मात्र असे करताना अनेकदा कंटिन्युटी पाळली गेली नाही. बरेच महत्त्वाचे असे संदर्भही निसटुन गेले. या हस्तक्षेपामुळे एरिक व्हॉन स्ट्रॉहेम फार दुःखी झाला. चिडलाही. ‘ही कापाकापी ज्याने केली, त्याच्या खांद्यावर, टोपीखाली काहीच नव्हते,’ असे उद्गार त्याने वैतागन काढले. चित्रपटाचे हे अंतिम रूप पाहताना ‘स्मशानातले प्रेत पाहावे तसे मला वाटले,’ असे त्याने म्हटले. मात्र, असे असले तरी या चित्रपटात जे काही उरले आहे. ते एका विलक्षण कलाकतीचा अनुभव देण्यास समर्थ आहे. मुकपट काळातील अनेक चित्रपटांना त्या- त्या काळाच्या संदर्भातच महत्त्व आहे. आज ते फारसे प्रभावी वाटत नाहीत. मात्र ‘ग्रीड’ ही कालातीत महत्त्व असलेली कलाकृती आहे. साहित्य आणि चित्रपट यांच्या परस्पर संबंधाचा ज्यावरून गंभीरपणे अभ्यास करता येऊ शकतो, त्यापैकी ‘ग्रीड’ हा पहिला चित्रपट. अप्रतिम टेकिंग, प्रभावी व्यक्तिचित्रण आणि घटनांचा चित्रपटीय तंत्राने वाढविलेला परिणाम यादृष्टीने हा चित्रपट अभ्यासण्यासारखा आहे.

माणसाच्या हव्यासातून निर्माण होणाऱ्या वेडाचे, विकृतीचे व त्यातून होणार्या अधःपतनाचे विदारक चित्र ‘ग्रीड’ या चित्रपटात रंगविले आहे. मॅक्टिग हा या चित्रपटाचा नायक सॅनफ्रान्सिस्कोच्या पॉल स्ट्रीटवर दातांचा दवाखाना उघडून बसलेला आहे. एका डेंटिस्टच्या हाताखाली शिकुन त्याने हा दवाखाना थाटला आहे. तो प्रशिक्षित डॉक्टर नाही. त्याच्याजवळ फारशी हुशारीही नाही. तो तसा मंदच आहे. अजस्रा शरीराच्या या माणसाजवळ जनावराचे सुस्त मन आहे. त्याच्या गरजा मुख्यत्वे शारीरिक आहेत. पोटभर खायला मिळाले, आवडता पाइप ओढता आला की तो समाधानाने जगतो. पिंजऱ्यात पाळलेल्या एका छोट्या पक्ष्याचे गाणे ऐकणे व जवळच्या कॉन्सर्टिनावर चार उदास धून वाजविणे, हा या माणसाचा विरंगुळा आहे.

अचानक हा माणूस प्रेमात पडतो आणि त्याचे जीवन बदलून जाते. त्यांचा मित्र मार्कस त्याची ओळख ट्रिना नावाच्या सुरेख मुलीशी करून देतो. खरे तर मार्कस तिच्यावर प्रेम करू लागलेला असतो, पण संकोचामुळे ते व्यक्त करणे त्याला जमलेले नसते. मॅक्टिगजवळ मात्र हा संकोच वगैरे नाही. त्याला ही तरुणी आवडते आणि बेधडक तो तिला लग्नाची मागणी घालन टाकतो. तिचा होकार मिळवन तिच्याशी लग्न करूनही टाकतो. मध्यंतरी एक घटना घडते. ट्रिनाला पाच हजार डॉलर्सची लॉटरी लागते. आता मात्र पोरगी हातची गेली व पैसाही गेला, याची दुहेरी टोचणी मार्कसला लागते. मॅक्टिगशी सारे संबंध तोडून त्याचा सूड घेण्याची तो प्रतिज्ञा करतो.

एके दिवशी मॅक्टिगला आरोग्य खात्याकडून दवाखाना बंद करण्याची नोटीस येते. आता कायद्याने तो डॉक्टरी करू शकत नाही. मग काय करावे, असा त्याला प्रश्न पडला. वयाची पस्तिशी उलटल्यावर जीवनाची चाकोरी बदलून नवा मार्ग शोधणे त्याला शक्य नसते. हळूहळू जवळचा पैसा संपून हलाखीचे दिवस येतात. एकदा सुस्थितीतील जीवन जगल्यावर गरिबीचे चटके जास्तच बसतात. नंतरची गरिबी असह्य बनते. आता ट्रिनाजवळ असलेले पाच हजार डॉलर मॅक्टिगला दिसू लागतात. त्यातले काही पैसे तरी तिने खर्चासाठी वापरावेत असे त्याला वाटते. पण उलट ट्रिनाला त्या पैशांचे अधिक मोल वाट लागते. ती अधिकाधिक कंजुष बनु लागते. पाऊस आलेला असतानाही ती मॅक्टिगला बससाठी पाच सेंटही देत नाही. काटकसरीचे तिचे क्रूर प्रयोग सुरू होतात. मॅक्टिगच्या मागण्या वाढत जातात तसा तिचा प्रतिकारही. ट्रिनाची पैशाबदलची आसक्ती विकृतीच्या पातळीवर पोहोचते. पैशांची मालकी केवळ असणे तिला पुरत नाही. वारंवार ती जवळची नाणी काढून कुरवाळते, त्यांना पॉलिश करते.

हळूहळू तीव्र लोभी बनणाऱ्या ट्रिनाची भूमिका झास पिट्स या अभिनेत्रीने अत्यंत प्रभावीपणे केली होती. मात्र चित्रपटातील सर्वांत उत्तम ठरली ती गिब्सन होलँडने केलेली मॅक्टिगची भूमिका. मूकपटांतील अजरामर भूमिकांपैकी ती एक मानली जाते. विशेषतः चित्रपटाच्या उत्तरार्धात शिकारी मागे लागलेल्या श्वापदासारखा वणवण फिरणारा, पैसा जवळ असूनही उपभोग घेता येत नाही यामुळे चिडणारा व शेवटी निमूटपणे मृत्यूला सामोरे जाणारा मॅक्टिग त्याने अविस्मरणीय बनविला होता.

पैशासाठी ट्रिनाची व मॅक्टिगची रोज भांडणे होऊ लागतात. एके दिवशी रागाच्या भरात मॅक्टिगच्या हातून ट्रिनाचा खून होतो व तो पैशाची पिशवी घेऊन पळुन जातो. आता कहाणीला वेगळेच वळण लागते. पोलिस मॅक्टिगचा पाठलाग करू लागतात. या पाठलागात मार्कस त्यांची मदत करतो. हा पाठलाग चुकवीत मॅक्टिग जिवाच्या आकांताने पळत राहतो. या शर्यतीचे अत्यंत चित्तथरारक चित्रण स्ट्रॉहेमने केले आहे. पळता पळता मॅक्टिग ‘डेथ व्हॅली’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाळवंटाजवळ येतो. समोर मैलोन् मैल नुसती भुसभुशीत अल्कलीची वाळू पसरलेली. सावली नाही, पाणी नाही. या उन्हाच्या कहारात ते वाळवंट पार करण्याचा प्रयत्न करणे हा शुद्ध वेडेपणा होता. पण दुसरा मार्ग नव्हता. एकदा वाळवंटात शिरल्यावर पोलीस मागे येणार नाहीत याची त्याला खात्री होती. पण ते पार करता येईल का? मात्र सारासार विचार करण्याच्या पलीकडे आता मॅक्टिग पोहोचला होता. एक घोडे, थोडे खाद्यपदार्थ, पाण्याची कॅन आणि प्राणपणाने जपलेल्या दोन वस्तू- पाच हजार डॉलरची पिशवी आणि सोबत आणलेला पिंजऱ्यातला पक्षी- एवढे घेऊन तो वाळवंटात पाऊल टाकतो.

पण मार्कस सूडाने पेटलेला असतो. तोही मॅक्टिगपाठोपाठ डेथ व्हॅलीत शिरला आणि एका क्षणी दोघेही एकमेकांसमोर आले. मार्कसजवळ पिस्तुल होते म्हणून शरण येण्याची त्याची आज्ञा पाळणे मॅक्टिगला भाग पडले. पण तेवढ्यात जवळचे घोड़े उधळले. त्याच्या पाठीवर पाण्याचा कॅन होता. घोड्याला पकडण्याच्या प्रयत्नांत त्याला गोळी लागून ते पडले व त्याच्या ओझ्याखाली कॅन फुटन पाणी सांडन गेले. तरीदेखील सोन्याच्या नाण्यासाठी दोघे प्राणपणाने लढ लागले. त्या झगड्यात मॅक्टिगने मार्कसच्या हातातील पिस्तुल हिसकावून त्याचे तडाखे मार्कसच्या डोक्यावर मारले. मार्कस कोसळला. पण मरता मरता आपल्या हातातील बेडी त्याने मॅक्टिगच्या हातात बांधन टाकली होती.

आता मार्कस मरून पडलेला. त्याचा हात मॅक्टिगच्या हाताशी बांधला गेलेला. जवळचे पाणी संपन गेलेले. मैलोन् मैल कुठे पाण्याचे नावनिशाण नाही. मृत्यू समोर दिसतो आहे. शेवटचे कृत्य म्हणून मॅक्टिग आपल्या पाखराला पिंजऱ्यातून मुक्त करतो. पण आता या ‘मुक्ती’ला फार उशीर झालेला असतो. ते अर्धमेले पाखरू काही क्षण उडते आणि पाण्याच्या रिकाम्या कॅनवर जाऊन बसते. प्राण सोडते. मॅक्टिग तळपत्या उन्हात वेड्यासारखा क्षितिजाकडे दृष्टी लावून मृत्यूची वाट पाहत बसून राहतो. कॅमेरा मिड क्लोजअपमधन लाँग शॉट घेतो. मग एक्स्ट्रीम लाँग शॉट. विशाल, विस्तीर्ण वाळवंटात एकटा मॅक्टिग… जणू वाळूचा एक कण…

एका विलक्षण सुन्न करून टाकणाऱ्या शेवटापाशी आपल्याला आणून चित्रपट संपतो. ही कथा आता फक्त मॅक्टिगची राहत नाही. लोभ आणि मोहाच्या वाळवंटात सापडलेल्या, प्रेमाच्या घोटभर पाण्यापासून वंचित झालेल्या कुठल्याही माणसाची ती होऊन जाते. सार्वकालिक बनते.

विजय पाडळकर